*मरावे कसे, How one should die*👌
खांदेकरी शिव्या देणार नाहीत तिरडी उचलताना,
इतपत वजन मर्यादित ठेवावे.
सरणावर ठेवताच जळायला मदत व्हावी,
म्हणून थोडी चरबीही असायला हरकत नाही अंगात.
पूर्णपणे जळून झाल्यावर उरणारी दोन -अडीच किलो वजनाची हाडे,
काही काळाने पंचमहाभूतांत विलीन होऊन जाणार आहेत,
त्यामुळे मेल्यावर आपले काही मागे राहील,
या भ्रमात राहण्याचा मूर्खपणा करू नये .
दातात भरलेली चांदी मात्र तशीच राहील;
त्याचे श्रेय दंतवैद्याला द्यायला हरकत नाही ,
बिचारा कायम विनोदाचा विषय झालेला !
दफन झाले तर कीड्यामुंग्यांना मेजवानी आणि
झाडांना दर्जेदार खत मिळणार आहे,
शिवाय शरीरातला काही भाग,
सल्फर आणि कार्बनच्या स्वरूपात,
पंचमहाभूतात विलीन होणार आहे,
ही माहितीसुद्धा हाताशी असू द्यावी .
बँकेत एवढाच बॅलन्स असू द्यावा,
ज्यामुळे वारसांमध्ये भांडणे लागणार नाहीत ,
मुले एकमेकांच्या जीवावर उठणार नाहीत,
सेवाभावी संस्था मागे लागणार नाहीत,
*८० - जी* चे प्रमाणपत्र घेऊन !
आणि असलीच थोडी प्रॉपर्टी तर,
मृत्युपत्र करताना मुलाच्या नावे करण्याऐवजी,
नातवाच्या नावे करावी,
म्हणजे नातू सज्ञान होईपर्यंत,
आपला नालायक मुलगा आपल्याला शिव्या देत,
शेवटच्या क्षणी पाणी पाजल्याचा पश्चात्ताप करीत,
रोज आपली आठवण काढत राहील .
स्वत:च्या अंत्ययात्रेच्या वेळी हसू नये,
जीवनाची कॉमेडी आठवून आणि
बऱ्या - वाईट आठवणींच्या क्षणांची नोंदवही
जाता जाता हळूच,
परमेश्वराच्या रद्दीच्या दुकानात टाकून पुढे सटकावे.
जन्माला का आलो आणि का मेलो,
यासारखे प्रश्न *'राम बोलो'* च्या डस्टरने पुसून टाकावे
मनाच्या पाटीवरून .
गल्लोगल्ली श्रद्धांजलीचे फलक लावण्यासाठी
आणि वृत्तपत्रात जाहिराती देण्यासाठी मित्रांना भुर्दंड पडेल ,
इतकी कीर्ती मिळवू नये .
पुतळ्याचेही स्वप्न बाळगू नये .
कारण कार्यकर्ते करतील त्याही निधीत भ्रष्टाचार
आणि कावळ्यांना मिळेल सार्वजनिक कमोड !
मरताना डोळे मिटलेले असावे ,
स्वतःच्या निधनाच्या चुकीच्या बातम्या वाचायला मिळू नयेत,
म्हणून आणि तोंड उघडे असू द्यावे
सांगायचे बरेच काही राहून गेले पण
ऐकून घेण्यासाठी कुणाकडेच वेळ नव्हता म्हणून .
महागुंगीच्या धुक्यात शिरताना,
समोर तो *स्टेशनमास्तर* भेटावा,
त्याच्याकडे चौकशी करावी
*' पुष्पक विमान '* कोणत्या प्लॅटफॉर्मला लागते याची
आणि वैकुंठाचे तिकीट काढून
वाट पाहत बसावे तुकारामाचे गाणे म्हणतः
*आम्ही जातो अमुच्या गावा , अमुचा राम राम घ्यावा !*
शेवटी सुरेश भटांची गझल आठवते
*मरणाने सुटका केली,*
*जगण्याने छळले होते।।*
No comments:
Post a Comment