हाव

गावच्या जत्रेत एक ५ वर्षाचं मूल आपल्या बाबांबरोबर फिरत होतं.

जत्रेतली लायटिंग, खेळ णी, खाऊ बघून प्रत्येक गोष्ट घेण्यासाठी बाबांकडे हट्ट करू लागलं.

बाबांकडे त्यानं बॅट मागितली, बाबांनी ती घेतली आणि पिशवीत टाकली.

पण त्याने हट्ट केला "बाबा.. माझ्याकले द्या".

बाबांनी दिली.

पुन्हा पुढं गेल्यावर त्याला खेळण्यातली ढोलकी दिसली.

बाबांनी घेतली आणि त्यांच्या पिशवीत टाकली.
आणि पून्हा मुलानं, " बाबा...मला दया".
बाबांनी दिली.

जरा पुढे गेल्यावर मुलानं खायला मागितलं. बाबांनी एक वेफर्सचं पॅकेट घेऊन त्याला दिलं.

एव्हाना त्याचे दोन्ही हात भरले होते.



बाबांनी त्याच्याकडे असलेली खेळणी पिशवीत ठेवायला मागितली पण त्याने नाही दिली.


पुढे आणखी फिरल्यावर त्याला आईस्क्रीम दिसलं.

हट्ट करून त्याने ते सुद्धा घेतलं.

पण हातातल्या इतर गोष्टी त्याला सोडवत नव्हत्या.

दोन्ही हात भरल्यावर मात्र बाबांचा हात सोडून तो चालू लागला.


एका हाताने खेळणी सांभाळत आणि दुसऱ्या हातात असलेलं आईस्क्रीम खाता खाता तो बाबांपासून कधी दूर जात हरवला ते त्यालाही नाही कळलं आणि बाबांनाही.

त्या गर्दीत बाबा कुठे दिसत नाहीत, म्हणून ते हिरमुसलं झालं आणि जोरजोरात रडू लागलं.

हातातली खेळणी आणि खाऊ फेकून जमिनीवर आडवं होऊन धाय मोकलू लागलं.



इतर लोकांनी त्याला शांत करण्यासाठी खेळणी देऊ केली, पण त्याने ती फेकून दिली.
आणि "बाबा... बाबा..." करत फक्त रडत राहिलं.




आता त्याला फक्त त्याचे बाबा हवे होते...



-------

काही जणांच सुद्धा असंच होतं.

पैसा, नाव आणि प्रसिद्धी कमवायच्या नादात आपल्या माणसांचा हात कधी सुटून जातो, ते आपल्याला सुद्धा नाही कळत.

वेळेवर भान आलं तर ठीक, नाहीतर हीच माणसं इतकी दूर गेलेली असतात, कि उरल्या आयुष्यात त्यांच्या केवळ आठवणीच आपल्याकडे उरतात......!
📚📚🖌🖌🎙🎙

No comments:

Post a Comment