*बदल*
"सर नमस्कार. मी चेतन शेलार, माळी सरांनी मला तुमच्याकडे पाठवलंय" दारात उभा असलेला तरुण म्हणाला.
" ये ये बैस"सुधाकरराव शिर्केनी त्याला आत बोलावलं.
चेतन आत येऊन अवघडून बसला.सुधाकररावांनी त्याचं निरीक्षण केलं.साधारण २४-२५ वर्षांचा साधारण व्यक्तीमत्वाचा तरुण दिसत होता.प्रथमदर्शनी चेतनबद्दल त्यांचं मत काही फारसं चांगलं झालं नाही.
"हं बोल कशाकरीता येणं केलसं?"खरं तर तो कशाकरीता आलाय हे त्यांना चांगलंच माहित होतं.माळी सरांनी त्यांना चेतनबद्दल सर्व कल्पना देऊन ठेवली होती.
"सर मी काही कथा लिहिल्या आहेत.त्यांचा कथासंग्रह करायचा विचार आहे.आपली प्रस्तावना हवी होती मला त्यासाठी"
"अगोदरचं काही साहित्य प्रकाशित झालंय?"
"नाही सर.हा पहिलाच कथासंग्रह आहे"
सुधाकररावांनी तोंड वाकडं केलं.
"म्हणजे अगदीच नवोदित आहेस तर!काय आहे मी नवोदित साहित्यिकांना प्रस्तावना देत नाही कारण त्यांच्या लिखाणातली वाक्यरचना योग्य नसते.प्रसंग योग्य तसे जोडलेले नसतात आणि व्याकरण तर अतिशय वाईट असतं.त्यांना काय लिहायचंय हेच समजत नाही.आणि वाचणाऱ्यांना काय लिहिलंय ते समजत नाही.अशा पुस्तकांना प्रस्तावना लिहून देणं म्हणजे स्वतःचा अपमान करुन घेणं आहे.आज ३०-३५वर्षांची माझी साहित्यसाधना आहे.ज्ञानपीठ सोडला तर साहित्यातले जवळजवळ सर्वच पुरस्कार मला मिळाले आहेत.अशा स्थितीत मला सांग एका नवोदित लेखकाला प्रस्तावना कशी द्यायची? अनुभवी लेखक म्हणजे ज्याची २-३ पुस्तकं तरी प्रकाशित झाली असतील अशा लेखकांच्या साहित्याला प्रस्तावना देणं बरंही वाटतं"
चेतनचा चेहरा पडला.खरं तर सुधाकरराव शिर्केसारख्या नामवंत साहित्यिकाकडे जायची त्याची हिंमतच नव्हती.माळी सरांनी आग्रह केला म्हणून तो आला होता.
"सर माळी सरांना मी सर्व कल्पना दिली होती.त्यांनी आपल्याला काहीच सांगितलं नाही?"
त्याने असं म्हंटल्याबरोबर त्याला उत्तर न देता सुधाकररावांनी मोबाईल उचलून पांडुरंग माळींना फोन लावला.चेतनची छाती धडधडू लागली
"अरे पांडुरंग हा चेतन इथे येऊन बसलाय.पण हा अगदीच नवोदित लेखक आहे.तुला माहितेय मी कोणत्या दर्जाचा साहित्यिक आहे आणि तरीही तू त्याला.....!बरं ठिक आहे.तू म्हणतोस तर मी वाचेन.पण मला आवडलं नाही तर प्रस्तावना देणार नाही.ठिक आहे ना?ओके"
त्यांनी मोबाईल बंद केला.चेतनकडे थोडं रागानेच बघत ते म्हणाले.
"माळी सर म्हणताहेत एकदा वाचून पहा.इथे कुणाला वेळ आहे असं वाचून पहायला!"
चेतन अजुनच अवघडला.काय बोलावं ते त्याला कळेना
"ठिक आहे"सुधाकररावच मग म्हणाले"माळी सर म्हणताहेत तर वाचून पहातो.तू मला पंधरा दिवसांनी फोन कर"
" धन्यवाद सर.बरं सर येतो मी"
नमस्कार करुन तो पटकन बाहेर पडला.
सुधाकररावांच्या पत्नी मालतीताई पाण्याचे ग्लास घेऊन नेमक्या त्याचवेळी बाहेर आल्या
"अरे गेला वाटतं तो मुलगा.अहो चहाचं तरी विचारायचं त्याला!"
"जाऊ दे असे कितीतरी नवोदित कवी,लेखक येत असतात.कुणाकुणाला चहा पाजणार?"
मालतीताई काही बोलल्या नाही.
सुधाकररावांचं असं वागणं त्यांना नवीन नव्हतं.गेल्या २५-३०वर्षांपासून सुधाकरराव साहित्य क्षेत्रात तळपत होते.१६ कादंबऱ्या,३५ कथासंग्रह,४४ काव्यसंग्रह,४०नाटकं याबरोबरच शेकडो लेख अशी सुधाकररावांची जबरदस्त साहित्य साधना.साहजिकच सुधाकररावांना याचा अहंकार होता.हा अहंकार त्यांच्या वागण्याबोलण्यातून दिसून यायचा. पद्मश्री, साहित्य अकादमी यासारखे बहुतेक सर्व पुरस्कार त्यांना मिळालेले.त्यांना पुरस्कार मिळाला की त्या पुरस्काराचाच सन्मान होतो असं त्यांच्याबाबतीत सन्मानाने बोललं जायचं.दोनतीन साहित्य संमेलनाचे अध्यक्षही ते राहून चुकले होते.एखाद्या लेखकाच्या पुस्तकाला त्यांची प्रस्तावना असली की त्या पुस्तकाचा आणि त्या लेखकाचाही दर्जा कैकपटीने वाढायचा.त्यामुळेच सुधाकरराव कुणाही ऐऱ्यागैऱ्या लेखकाला प्रस्तावना देत नसत.शिक्षकी पेशात असतांनाच ते कडक शिस्तीचे होते.आता निव्रुत्त झाल्यानंतरही ती शिस्तही थोड्याफार प्रमाणात शिल्लक होतीच.
पांडुरंग माळी त्यांचे बालपणीचे जिवलग मित्र.सुधाकररावांसारखे चतुरस्त्र साहित्यिक नसले तरी कवी म्हणून प्रसिद्ध होतेच.त्यांनी पाठवलेल्या लेखकाला सुधाकररावांनी प्रस्तावना दिली नाही असं कधीही झालं नव्हतं.आजमात्र पांडुरंगाने ऐका पंचवीशीच्या नवोदित लेखकाला प्रस्तावनेसाठी पाठवून आपला अपमान केलाय असं त्यांना राहून राहून वाटत होतं.
आठवडा उलटून गेला तरी सुधाकररावांनी चेतनच्या कथांकडे ढुंकूनही पाहिलं नाही.नवख्या लेखकाच्या कथा कचऱ्यात टाकायच्या लायकीच्याच असतात असं त्यांना वाटत होतं.
आठव्या दिवशी त्यांच्या दारावर एक आलिशान गाडी उभी राहिली.उत्सुकतेने त्यांनी दार उघडलं तर समोर एक पस्तीशीची देखणी बाई उभी होती.
"नमस्कार सर.मी आरती छाबरीया,छाबरीया इंडस्ट्रीजची चेअरमन"
"नमस्कार!या या बसा"सुधाकरराव आदराने त्यांना आत घेऊन गेले.छाबरीया इंडस्ट्रीज शहरातली मोठी आणि नावाजलेली कंपनी होती.
"आज काय काम काढलंत आमच्याकडे?"
त्याचवेळी मालतीताई पाणी घेऊन आल्या.आरतीबाईंनी पाण्याचा एक घोट घेऊन ग्लास ठेवून दिला.मग पर्समधून एक फाईल काढली.सुधाकररावांपुढे ठेवत म्हणाली
"सर मी एक छोटीशी कवयित्री आहे.थोडा फार वेळ मिळेल तशा कविता करते.या कवितांचं एक पुस्तक प्रकाशित करायचा विचार आहे.त्याला आपण प्रस्तावना द्यावी अशी विनंती आहे"
बाईंच्या व्यक्तिमत्वाने सुधाकरराव अगोदरच भारावून गेले होते.त्यांनी फाईल हातात घेतली आणि म्हणाले
"मँडम मी नवोदित कवींना प्रस्तावना......"
"देत नाही हे मलाही माहीत आहे.आणि तुमच्याइतक्या महान साहित्यिकांनी ती का द्यावी?पण माझ्या पुस्तकाला तुमचीच प्रस्तावना असावी हे माझं स्वप्न होतं सर.तेव्हा प्लीज नाही म्हणू नका सर.मी तुमचं मानधनही द्यायला तयार आहे"
असं बोलून तिने पर्समधून चेकबुक काढलं.चेकवर सही करुन चेक सुधाकररावांच्या हातात दिला
"पंचवीस हजार आहेत सर.कमी वाटत असतील तर सांगा.आणखी देते"
सुधाकररावांनी चेक हातात घेऊन त्याकडे पाहिलं.आजपर्यंत प्रस्तावना लिहून द्यायचे त्यांना कुणी पैसे दिले नव्हते.त्यांनीही कधी मागितले नव्हते.
" पण सर मला घाई आहे.माझ्या मँरेज अँनिव्हर्सरीला ते पुस्तक प्रकाशित करायचंय.त्याचंही निमंत्रण तुम्हाला आताच देऊन ठेवते.पत्रिका येईलच.तेव्हा दोन दिवसात जमेल सर?"
"प्रयत्न करतो"
" प्लीज सर.आणि हो,प्रकाशनाला मुख्यमंत्री येणार आहेत.त्यांच्या हस्ते तुमचा सत्कार करायचा विचार आहे"
सुधाकररावांचा चेहरा आनंद आणि समाधानाने फुलला.
"धन्यवाद मँडम"
" अहो धन्यवाद कसले!हे तर आमचं भाग्य आहे की तुम्ही प्रस्तावना द्यायला आणि आमच्या अँनिव्हर्सरीला यायचं कबुल केलंत.बरं सर येऊ?दोन दिवसांनी कुणाला तरी पाठवते प्रस्तावना घ्यायला"
सुधाकररावांनी तिला नमस्कार केल्यावर ती बाहेर पडली.
रात्री जेवण झाल्यावर सुधाकररावांनी उत्सुकतेने ती कवितांची फाईल काढून एकेक कविता वाचायला सुरुवात केली.दोनतीन कविता वाचूनच त्यांच्या लक्षात आलं की कवितांचा दर्जा अतिशय सुमार आहे.नुसतं यमक जुळवलं म्हणजे कविता झाली असा बाईंचा गैरसमज झाला होता.अगदी एखाद्या शाळकरी मुलीने कविता लिहाव्यात अशा त्या कविता होत्या.फक्त अर्ध्या तासात त्यांनी त्या ५६ कविता वाचून पुर्ण केल्या आणि त्यांच्या लक्षात आलं की त्या सर्वच कविता रद्दीत फेकून देण्यासारख्या आहेत.त्यांना त्या बाईचा आणि स्वतःचाही संताप आला.अशा फालतू पुस्तकाला आपल्यासारख्या एका पद्मश्री प्राप्त लेखकाने प्रस्तावना द्यावी हे काही त्यांना पटेना.पण प्रश्न व्यवहाराचा होता.बाईंनी दोन पानाच्या प्रस्तावनेला पंचवीस हजार मोजून त्यांचा स्वाभिमान आणि त्यांची तत्वं विकत घेतली होती.वर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्काराचं गाजरही दाखवलं होतं.आता हा व्यवहार पुर्ण करणं भाग होतं.त्यांनी नाईलाजाने लँपटाँप पुढे ओढला.मोठ्या अनिच्छेने त्या रद्दी
कवितांची आणि मोठी उद्योजिका असुनही कवीमन जपणाऱ्या आरती छाबरीयाची तारीफ करणारी प्रस्तावना त्यांनी तयार केली.
दोन दिवसांनी आरतीबाईंचा एक माणूस येऊन ती प्रस्तावना घेऊन गेला.झाल्या प्रकाराने सुधाकरराव स्वतःवरच नाराज होते.नवख्या लेखकांना आता कोणत्याही परीस्थितीत प्रस्तावना लिहून द्यायची नाही हे त्यांनी ठरवून टाकलं.
चार पाच दिवसांनी पांडुरंग माळींचा फोन आला.चेतनच्या कथा वाचल्या की नाही हे विचारत होते.सुधाकररावांनी नाही सांगितल्यावर ते नाराज झाले.एकदोन दिवसात तरी प्रस्तावना तयार ठेव अशी विनंती केली.त्यांच्या समाधानासाठी सुधाकररावांनी मनाविरुद्ध होकार दिला.दुपारी जेवण झाल्यावर मात्र टेबलवर केविलवाण्या अवस्थेत पडलेल्या त्या कथा पाहून त्यांनी त्या सहज वाचायला सुरुवात केली.पहिली कथा वाचली,दुसरी वाचली,तिसरी वाचली. म्हणता म्हणता सहा कथा वाचून झाल्या तरी त्यांना शुध्द नव्हती.मालतीताईंनी चहासाठी जोरजोरात हाका मारल्या तेव्हाच ते भानावर आले.भानावर येताच त्यांना पहिली जाणीव झाली की त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहताहेत.या कथांनी आपल्याला रडवलं यावर त्यांचा विश्वास बसेना."बापरे काय अप्रतिम कथा आहेत या.त्या पंचवीशीच्या पोराने लिहिल्या आहेत असं वाटतच नाही.कुठून आली इतक्या लहान वयात एवढी प्रगल्भता" ते मनाशी पुटपुटले.
दुसऱ्या दिवशी त्यांनी उरलेल्या दहा कथा न थांबता वाचून काढल्या."अप्रतिम!"त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडला."म्हणूनच पांडुरंगाने त्या पोराला आपल्याकडे पाठवलं.उगीचच आपण त्या पोरावर उखडलो" त्यांना छाबरीया बाईची आठवण झाली.त्या बाईच्या सौंदर्यामुळे, तिने दिलेल्या पैशामुळे आणि एकंदरीतच राजदरबारी तिचं वजन पाहुन आपण खोटी प्रस्तावना लिहून दिली याचा त्यांना प्रचंड विषाद वाटला.
या पोराला आता प्रस्तावना लिहून दिलीच पाहिजे या विचाराने त्यांनी लँपटाँप सुरु केला.काही वाक्यं लिहिली आणि एका विचाराने ते थबकले. "चेतनचं हे पुस्तक बाजारात आलं की त्याला पुरस्कार मिळाल्याशिवाय रहाणार नाही.त्यातून आपली प्रस्तावना म्हणजे या कथासंग्रहाला भरपूर प्रसिद्धी मिळणार.एका नवख्या कथाकाराने नामवंत लेखकांना मागे टाकलं असं तर होणार नाही?साहित्य अकादमीसारखा पुरस्कार जर मिळाला तर चेतनसारखा तरुण हवेतच उडेल.एका गावात राहून सगळे मानसन्मान त्यालाच मिळतील.कोणताही साहित्यविषयक कार्यक्रम असला की त्यालाच बोलावलं जाईल.मग आपल्यासारख्या जुन्या साहित्यिकांना कोण विचारतंय?"
या विचारासरशी ते अस्वस्थ झाले.त्यांनी लँपटाँप बंद करुन टाकला.
"या जिल्ह्यात आपल्यासारखा नामांकित लेखक दुसरा कुणीच नाही.पुण्यामुंबईकडचे मोठे लेखक त्याच्यासारख्या नवोदित लेखकाला प्रस्तावना देणं शक्यच नाही.आपण जर प्रस्तावना दिली नाही तर तो कुठल्यातरी सामान्य लेखकाची प्रस्तावना घेईल.अर्थातच पुस्तकाचा प्रभाव कमी होईल आणि पुरस्कारांची शक्यता देखील कमी होईल"
विचार करुन सुधाकररावांना थकवा आला.कौतुकाची जागा आता मत्सराने घेतली होती.त्यांना स्वतःला वयाच्या पंचेचाळीसव्या वर्षी पहिला पुरस्कार मिळाला होता.तोपर्यंत त्यांचे सहा कथासंग्रह, अकरा काव्यसंग्रह प्रकाशित होऊन चुकले होते."चेतनच्या पहिल्याच पुस्तकाला पुरस्कार मिळू नये,कमीतकमी त्यात आपला हात असू नये" या विचारासरशी त्यांनी निर्णय घेतला."बस!चेतनच्या पुस्तकाला प्रस्तावना द्यायची नाही.मग पांडुरंगाने कितीही आग्रह केला तरीही"
रात्री मालतीताईंसोबत जेवण करत असतांना चेतनचा फोन आला.
" सर झाली का प्रस्तावना लिहून?"
"नाही चेतन.साँरी.मला कथा आवडल्या नाहीत.म्हणून मी लिहिली नाही.तू उद्या येऊन तुझ्या कथा परत घेऊन जा"
क्षणभर शांतता पसरली.चेतनला त्यांचा निर्णय पचवणं अवघड झालं असावं. मग परत त्याचा आवाज ऐकू आला.
"सर तुमच्या परीचयाचे दुसरे लेखक असतील तर त्यांचं नाव सुचवाल?"
"खुप लेखक पडले आहेत.माळी सरांना विचार ते सांगतील"
"ठिक आहे सर.उद्या मी मुंबईला जातोय. परवा येऊन कलेक्ट करतो सर"
"ओके" म्हणून त्यांनी फोन ठेवला तेव्हा मालतीताई त्यांच्याकडे आश्चर्याने पहात होत्या.
" काय म्हणालात?तुम्हांला त्या कथा आवडल्या नाहीत?अहो काल दुपारी तुम्ही जेव्हा चहाला आलात तेव्हा तुमच्या डोळ्यातून अश्रू वहात होते.नक्कीच तुम्ही त्या चेतनच्या कथा वाचूनच रडला
होतात अशी माझी खात्री होती.कारण त्या कथा मी सुद्धा वाचल्या आणि माझीही स्थिती तुमच्यासारखीच झाली. फारच सुंदर,अप्रतिम कथा आहेत त्या आणि तुम्ही म्हणता आवडल्या नाहीत! कमाल आहे"
" मालती तू फक्त वाचक आहेस मी साहित्यिक आहे.कोणत्याही पुस्तकाला प्रस्तावना द्यायला मला शंभर वेळा विचार करावा लागतो"
"हो? मग त्या छाबरीया बाईंच्या पुस्तकाला प्रस्तावना देतांना तुम्ही एकदाही विचार केलेला दिसत नाही"
"म्हणजे?"
"कसल्या फालतू कविता होत्या त्या!मी वाचल्या होत्या.मला तर वाटलं होतं तुम्ही पंचवीस हजाराचा चेकही परत करुन प्रस्तावना द्यायला मनाई कराल.तुम्ही तर एका झटक्यात प्रस्तावना लिहून दिलीत.चेतन तुम्हाला पैसे देणार नाही म्हणून तुम्ही त्याला नाही सांगितलं का?"
"नाही तसं नाही.चेतनची ३-४ पुस्तकं असती तर विचार केला असता"सुधाकरराव खालच्या स्वरात म्हणाले.मालतीताईंची नजर ते टाळत होते.
" समजलं मला तुम्ही का नाही म्हणताय ते! चेतनसारख्या नवख्या आणि तरुण लेखकाच्या पुस्तकाला मोठमोठे अँवाँर्ड्स मिळाले तर तुमची किंमत कमी होईल असंच ना?"
सुधाकरराव चुप बसले.मालतीताईंनी त्यांचा वीक पाँईंट बरोबर हेरला होता.
" अहो इथे माणसाच्या जीवनाची शाश्वती नाही.नियतीच्या एका फटक्यात होत्याचं नव्हतं होऊन जातं.तिथे मी मोठा,माझे मानसन्मान महत्वाचे असं करुन कसं चालेल?आणि तुम्हांला काय मिळायचं राहिलंय?पुरस्कारांनी कपाटं भरली आहेत.अनेक साहित्य संमेलनात तुमचा गौरव झालाय.अनेक मोठे साहित्यिक आले आणि काळाच्या पडद्याआड गेले.काय मागे राहिलं तर फक्त त्यांच्या आठवणी.आणि या मधूर आठवणींसाठी लागते ती तुमची चांगली वर्तणूक आणि नम्रपणा. गेल्या काही वर्षांपासून मी पहातेय तुम्ही फार गर्विष्ठ झाले आहात.माझ्यासारख्या महान मीच अशी तुमची समजूत झालीये.आता गरज आहे ती चेतनसारख्या तरुण लेखकांना प्रोत्साहित करण्याची.त्यांना मार्गदर्शन करण्याची.पुढेमागे जर त्याला पुरस्कार मिळालेच तर ते पुरस्कार तुम्हांला अर्पण करायला ते मागेपुढे पहाणार नाहीत.आणि त्यावेळी तुम्हांला मिळणारा सन्मान नेहमीच्या सन्मानापेक्षा कितीतरी पट मोठा असेल.बघा विचार करा"
सुधाकरराव काही बोलले नाहीत.उठून त्यांनी हात धुतला आणि टिव्ही बघायला बैठकीत गेले.
दोन दिवसांनी चेतन कथा परत न्यायला आला.मालतीताई तिथेच पुस्तक वाचत बसल्या होत्या.चेतनला त्यांनी बसायला सांगितलं.त्याचा उदास चेहरा पाहून त्यांच्या ह्रदयात कालवाकालव झाली. सुधाकरराव उठले.आतल्या खोलीत जाऊन त्यांनी त्याच्या कथांची फाईल आणली.
" या तुझ्या कथा आणि ही प्रस्तावना"
सोबत दोन टाईप केलेले कागद त्याला देत ते म्हणाले.
"प्रस्तावना?"चेतनने चमकून त्यांच्याकडे पाहिलं
"सर तुम्ही तर नाही म्हणाला होतात ना?"
मालतीताईही त्यांच्याकडे आश्चर्याने बघू लागल्या.
सुधाकररावांनी स्मित केलं आणि म्हणाले
"चांगली की वाईट ते तरी बघ"
चेतन परत धास्तावला. त्याने ती प्रस्तावना वाचायला सुरुवात केली.जसजसा वाचत गेला तसतसा त्याचा चेहरा आनंदाने खुलत गेला.वाचून संपवल्यावर तो हर्षातिरेकाने ओरडला
"सर!धन्यवाद सर,खुप छान प्रस्तावना दिलीत" आणि एकदम उठून त्याने त्यांचे पाय धरले.त्यांनी त्याला उचलून जवळ घेतलं
"अरे मी तुझी गंमत करत होतो.फार अप्रतिम कथा आहेत तुझ्या!वाचतांना सारखे डोळे भरुन येत होते.कुठून शिकलास इतकं सुरेख लिहायला?"
"सर तुमची पुस्तकं वाचूनच मला प्रेरणा मिळत गेली"
मालतीताई आणि सुधाकररावांनी एकमेकांकडे पाहिलं.मालतीताई बरोबरच म्हणत होत्या.कुणाला सन्मान दिला की त्याचं श्रेय आपल्यालाच मिळतं.
" कुठे देणार आहेस पुस्तक प्रकाशनाला?"
मालतीताईंनी चेतनला विचारलं.
"इथेच बघूया.पुण्यामुंबईकडचे प्रकाशक तर काही तयार होणार नाहीत"
"त्याची काळजी नको चेतन"सुधाकरराव मध्येच म्हणाले."मी मुंबईच्या एका प्रसिद्ध प्रकाशकाला तुझ्या कथा ईमेलने अगोदरच पाठवून दिल्या आहेत.माझी प्रस्तावना आहे म्हंटल्यावर तो लगेच तयार झाला.एका महिन्यात मिळेल आपल्याला पुस्तक"
" सर तुमचे आभार कसे मानावे तेच कळत नाही"
"नकोच मानू.असाच सुंदर सुंदर कथा लिहित जा"
मग मालतीताईंकडे पहात ते म्हणाले
"अहो जरा चहा करा ना.उगवत्या साहित्यिकांचं स्वागत करायला नको का?"
मालतीताईंनी समाधानाने नवऱ्याकडे पाहीलं.सुधाकररावात झालेला बदल त्यांना सुखावून गेला.
*© दीपक तांबोळी*
9503011250
(ही कथा माझ्या नावासह शेअर करण्यास माझी हरकत नाही. क्रुपया नांव वगळू किंवा बदलू नये)

No comments:
Post a Comment